Sunday 4 August 2024

पुणे

 नद्यांचीही केली नाली, बेकायदा वस्ती उदंड झाली,

धारावीसारखेच बकाल, पुणे माझे|


सर्वत्र वाहतूक सुस्त, नागरिक अती त्रस्त

ढाका, लाहोरहूनही सुमार, पुण्य नगरी|


चौका चौकात "भाई" खूप, पोस्टर लावून करती शहर विद्रूप,

गाव गुंडांचे माहेरघर, पुणे सारस्वतांचे|


उशाला धरणे चार, पण राजकारणी करी टँकर व्यापार

गाढवापेक्षाही लाचार, सुसज्ज पुणे|


रावांच्या शिक्षणदुकानी विद्यार्थी रंक, अमाप पैश्यांचा करून घेती डंख

चालवी शिक्षणाचा बाजार, "ऑक्सफर्ड" पूर्वेचे|


मुलांना खेळायला मैदाने नाही, ज्येष्ठांना चालायला उद्याने नाही

फूटपाथ विना जीवघेणे, पुणे सजगांचे|


रस्तोरस्ती कचऱ्याच्या राशी, शुद्ध हवा मिळेल कशी

प्रत्येक ऋतूत नवा आजार, देई पुणे|


कोयते-कट्टे हातोहाती, नेते-गुंडांची घट्ट नाती

विरला कायद्याचा आधार, बा पुणेकरा|


करदात्यांच्या बाल्कनीशेडला नियमांचा दट्ट्या, मात्र वोटबँकेच्या वाढती झोपडपट्ट्या

वाहते फुकट्यांचा भार, पुणे मुके|


सुविधा, सुरक्षा संपत चालली, संस्कृती संपूनी विकृती वाढली

होतेय चहूबाजूने उणे, पुणे माझे|


शिवराय, बाजीरावांच्या तेजाची धार, ज्ञानोबा, तुकोबा, टिळकांचा  विचार

अंमलात स्वतःच्या आणेल का, पुणे माझे?


---

श्रीपाद

५ जुलै २०२४