सावधान !! आता तरी जागे व्हा !!
आपली घोर फसवणूक होत आली आहे आणि अजूनही जगात आपल्याला "आयुष्य कस जगावं" ह्याचे डोस पाजणाऱ्यांची बौद्धिक भामट्यांची एक वेगळीच फौज आपल्या आयुष्याच्या मूळ उद्देशावर अतिक्रमण करत आली आहे. लहानपणी पंचतंत्रातील गोष्टी, नंतर शाळेतील सुविचार, सांसारिक आयुष्यात संत वचने , पालक, नातेवाईक, मित्र हे सगळे आपल्याला आपल्या ह्या भूतलावरील अवताराचा खरा उद्देश आपल्याला कळू न देता दांभिकपणे आपल्याला गाफील ठेवत आले आहेत.
आपला जन्मच समाजाचे काही भले करण्यासाठी झालाय तर समाजात इतर लोक का जन्माला आलेत हा सरळ प्रश्न आमच्या कवटीत येतो ! 🤔
सकाळी डोळे उघडून बघावे तर मोबाईल त्या सुविचारांच्या ओझ्याने वाकलेला असतो
काय ते एक एक मेसेज?
डॉ. कलामांनी तत्वज्ञान विषयात PHd केली होती की वैज्ञानीक संशोधनात हा एक अभ्यासाचा विषय,
विश्वास नांगरे पाटील मोबाईल वर पावसाळी वातावरणात वीज कशी पडते ह्याचे ज्ञान वाटतात
नाना पाटेकरांच्या नावाने तर इतकी ज्ञानगंगा वाहतेय की त्यांना प.पू. ही उपाधी मिळेल अशी शंका येते
कोणी फुलांच्या, कोणी मुलांच्या, कोणी देवाच्या चित्रावर मनाला वाट्टेल ते सुविचार खरडून देतो पाठवून! अरे कुठं फेडाल हे पाप?
कोणी तुम्हाला अडचण सांगितली की दे सल्ला, कोंब सुविचार कानात आणि फाड त्याचा मेंदू हे असले धोरण राबवतात काही जण. काय झालय लोकांना?
बरं ह्यांचे सुविचार अभंग, ओव्या, चारोळ्या, शायरी, गझल, इंग्रजी र्हाइम्स अश्या मिळेल त्या स्रोतातून ओरबाडून आणलेले असतात
ही सुविचारी टोळी फक्त तत्वज्ञान वाटून थांबत नाही तर
आरोग्य, अर्थकारण, राजकारण, क्रीडा, स्वयंपाक, कुटनीती अश्या सगळ्याच क्षेत्रात फोफावली आहे
काय ते ह्याच्यात ते टाकून प्या किंवा खा मग अमुक तमुक आजार कसा बरा होतो
एखाद्या राजकारण्यांचे उदात्तीकरण करण्याचा कारखाना काढणे
देशाचे आर्थिक धोरण ठरविणे असे प्रकांड उद्योग बिनबोभाट चालू आहेत आपल्या भोवती
किती माहिती आपण विनाकारण आपल्या आधीच ताणलेल्या मेंदूत विनाकारण कोंबत असतो, का? कोणासाठी? कशासाठी? कधीपर्यंत?ह्याचा विचार न करता आपण सगळे हे ज्ञान वाटत फिरत असतो
आपल्याला खरी गरज आहे विरंगुळ्याची आणि तो मिळतो खऱ्या खुऱ्या गोष्टींतून
खेळांमधून, गप्पा मारून, सोबत जेवण करून, प्रवास(सुटी म्हणून) करून, घरात स्वछता करून, नवं काही शिकून, व्यायाम करून, मुलांना खेळवून, ज्येष्ठांना ऐकून
प्रत्येक नव्या गोष्टी सोबत वाहत जाण्यापेक्षा आपल्याला काय आवडत ते करण्यात खरं जगणं आहे, अस मला वाटत. नाहीतर तुम्हाला अस नको वाटायला की मीच ज्ञान द्यायला लागलोय
कळकळ ह्याचीच वाटते की माणसांमधले संवादाचे साधन म्हणून तयार झालेली साधनेच तो संवाद तोडायला लागलीत
आणि न कळत रात्री झोपताना हे जाणवत की शांततेच्या शोधात प्रगती करणाऱ्या माणसाच्या जाणिवांचे त्याच प्रगतिशी 'युद्ध आमुचे सुरू' असे हाल झालेत.
घ्या काळजी!!