Monday, 23 July 2018

आदिमानव आणि डेटा सिक्योरिटी

काल परवा पर्यंत आरामात बसलेल्या झुक्याची झोप उडाली , जो तो त्याला अद्वा तद्वा बोलायला लागला आणि होत्याच नव्हतं झालं बिचाऱ्याच!! वाईट वाटलं हो त्याच्याबद्दल.

त्याच्यामुळेच तर कैक कोटी ज्ञानी भारतीयांचा शोध लागला आपल्याला

मेकॉले ला मागच्या 100 वर्षात जे जमलं नाही ते मागच्या 10 वर्षात झुक्याच्या फेसबुकने करून दाखवलं.('करून दाखवलं' अस बोललं की शिवसैनिकांना निवडणुकीचा कैफ चढतो, पण इथं संदर्भ वेगळा आहे).

ह्या ऑनलाइन ब्रह्मदेवाने भारतात अचानक कोट्यवधी अर्थशास्त्री, समाजवादी, आरोग्यतज्ज्ञ, धर्मपंडित, राजकीय मुत्सद्दी जन्माला घातले जे ऑनलाइन चावडीवर बसून स्वतःची खाप पंचायत, दवाखाने, धार्मिक कार्यक्रम राबवत आहेत आणि अनेक रिकाम्या माठांना ज्ञानाचे पाझर फुटले.
जो तो तावातावाने आपापल्या अगाध ज्ञान सागरात इतरांना बुडवून अर्धमेलं होई पर्यंत डुंबवू लागलाय.

बरं हे ज्ञानसागर ढवळून काढायला लागणाऱ्या इंटरनेट नामक 'वासुकी नाग' अंबानी तात्यांनी लागोलाग आणला
मग काय भयंकर मंथन सुरू!
सकाळीच 'हॉट सीट', दिवसभर ऑफिस सीट, रात्री बेड वर पडून डोळे फुटोस्तर कमेंट्स लिहिणे, पोस्ट फॉरवर्ड करणे, टॅग करणे असे अनेक रत्न सुर-असुरांच्या हाती लागत राहिले

पण एक दिवस अचानक त्यातून 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल निघाले आणि हे सगळे ज्ञानी तळमळायला लागले. त्यांना असं वाटायला लागलं की झुक्याने तयार केलेली ही सृष्टी खोटरडी आहे, पापी आहे
कोणी मग स्वतःची लक्तरे लपवण्यासाठी अश्याच काही पोस्ट्स वर BFF लिहून पापक्षालन करण्याची केविलवाणी धडपड करू लागले
पण काही ताठ कण्याचे ज्ञानी लोक सरळ सरळ झुक्याला दोष देऊ लागले की आमची मौल्यवान खासगी माहिती तू विकली आता तुला माफी नाही
त्यात पुन्हा असुरांचे शिरोमणी पप्पूरासुर ह्यांनी ठिणगी टाकली की इंद्रा('नरे' सायलेंट आहे) हे हलाहल निर्माण करून स्वर्गाच सिंहासन मिळवलंय वैग्रे वैग्रे

शेवटी 'अनलिटीका' युगात झालेल्या ह्या मंथनाचे प्रायश्चित्य म्हणून शेवटी झुक्यानेच 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल स्वतः च प्राशन करून ह्या ऑनलाइन सृष्टीला वाचवले

राहिला प्रश्न फेसबुकज्ञानी लोकांचा, त्यांच्यासाठी......

"हे हुच्च प्रतीच्या ज्ञानी विद्वानांनो तुम्ही का बरे हुंकारता डेटा सिक्योरिटी साठी? तुम्हीच तर स्वतः ओक ओक ओकता सगळं सगळीकडे
तुमचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो, आधारकार्ड च्या प्रति सगळीकडे वाटत फिरता उघड उघड.
बिनकामाच्या लिंक वर जाऊन 99 रुपयात रिबॉक चा बूट मिळवणारे, 'विशेष' फोटोखाली स्वतःच्या नावाचे तीन अक्षर आणि .com लिहिणारे, फेसबुक खात सुरक्षित ठेवण्यासाठी BFF लिहिणारे तुम्ही अजूनही 'ऑनलाइन आदिमानव' आहात "

नको त्या वावटळीच्या मागे पळणारे रिकामटेकडे लोक केवळ इंटरनेट आणि फोन स्वस्त झाले म्हणून वाट्टेल ते थेर करणारे अर्धवट ज्ञानी असे कोट्यवधी भारतीय केवळ लोकशाही आहे म्हणून निव्वळ बेबंद वागत आहेत. जो पर्यंत हे असे लोक सुधारत नाहीत तोपर्यंत 'डेटा सिक्योरिटी' वर विचारमंथन करणाऱ्या पुढारलेल्या जगासमोर हे लोक अजूनही 'आदिमानव'च समजावे लागतील

-----------------------------
©Shreepaddeshpande
14 April 2018

No comments:

Post a Comment